Sunday, May 11, 2014

माझी आई


माझी आई दहावीत तिच्या शाळेत पहिली आली, प्रचंड वाचनाची आवड. आजोबांनी दहावी झाल्यावर लगेच लग्न करुन दिलं. पुढे शिकायची तिची जबरदस्त ईच्छा पण आम्हा दोघींना लहानपणी कोण सांभाळणार म्हणुन विचार सोडला. पुणे टेलिफोन भवनात कसलीशी परीक्षा दिली त्यात पास होऊन तिचा चांगल्या पोस्ट साठी नंबर लागला पण आमच्यासाठी तिने ते केले नाही. घरी होती तेव्हाही ती शांत न बसता वाचनाची आवड चालु ठेवली.  सार्वजनिक वाचनालयातली सगळ्या पुस्तकांचा फडशा पाडला. वाचनालय खुप मोठे होते तरी तिला सगळीच पुस्तकं वाचुन झाली म्हणुन काही काही पुस्तकं २-३ दा वाचली. आम्ही शाळेत गेल्यावर टायपिंग शिकली. मग बँकेत, शाळेत तिने लेखनिकाची नोकरी केली.
आमच्या भविष्यासाठी चांगले म्हणुन पुण्याचा घर घेण्याचा हट्टच केला बाबांकडे. घराला मदत आणि शांत न बसण्याची वृत्ती ह्यामुळे पुण्याच्या कोर्टात काम करायला सुरुवात केली . तिथे तिच्या हुशारीने पटकन जम बसविला. मी बारावीत आणि बहिण दहावीत असताना तिचा अपघात झाला. मृत्युच्या तोंडातुन ती तिच्या जबरदस्त मनोबलाने बाहेर आली .
नोकरी करताना सगळे सांभाळून सर्व सण अगदी साग्रसंगीत साजरे करायची, पण आम्हाला कधीच कशासाठी आग्रह केला नाही. आधी अभ्यास करायला महत्त्व दिले.
आठवड्यासाठी  ताजे फराळाचे करायची, आम्हाला शाळेतून आल्यावर खायला ती नसताना . तिचे प्लनिंग पण नेहमी असे की एन वेळी आलेल्या पाहुण्याला पण व्यवस्थित पाहुणचार मिळे

तेव्हाच माझ्या कॉलेज प्रवेशाची वेळ आली.  तेव्हा बाबांना बाहेर गावी ठेवायला नको वाटत होते, हिने खुप समजाऊन स्वत: माझ्या शिक्षणाची जबाबदारी उचलली. आज जी काही मी आहे, त्यात  तिचा सिंहाचा वाटा आहे.
आज पण कधी पण खचले तर पहिले तिच्याशीच बोलते. मुल झाल्यावर नोकरी करणे हा निर्णय मी घेतल्यावर परत मागे न बघण्यासाठी तिची फार मदत झाली. तिच्या सांगण्याने धैर्य वाढले .
जवळपास पन्नाशीच्या आसपास नवीन सगळ्या गोष्टी शिकुन स्वत:चा ब्लॉग लिहिते.
तिने नोकरीतून रिटायरमेंट घेतल्यावर एकाही क्षण गप्प बसली नाही . समाजकार्य, भटकंती ह्यामध्ये ती सतत काही ना काही करत असते . ती रहाते तिथल्या सोसायटीची सेक्रेटरी म्हणुन काम पहाते. ही कॉलनी बरीच मोठी आहे आणि काम करणं कठीण, पण अवघड रस्त्यातुन  मार्ग काढणे हा तिचा पिंडच आहे .
तिला फिरायची जबरदस्त आवड आहे. लहानपणापासुन सगळा भारत तर फिरून झाला आहे, पण बाहेरील देश पण फिरून आली आहे.
आई तुला सलाम !!




3 comments: